धार्मिक कार्यक्रमांना गुरुजींच्या बुकिंगसाठी मोबाईल ऍपचा वापर
पुणे – कामानिमित्त पुण्यात नुकतीच शिफ्ट झालेली नीशा, नवीन घराच्या वास्तुशांतीसाठी मुहूर्त आणि गुरुजी शोधत होती. नवे शहर, नवीन जागा आणि नवीन माणसं… सगळंच तिच्यासाठी नवीन. मग पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी कशी सांभाळणार बिचारी. या वेळी मात्र ऑनलाइन मुहूर्त, गुरुजी आणि सामग्री घरपोच मिळवून देणारे “ऍप्लिकेशन‘ मदतीला धावून आले. एका क्‍लिकवर सगळ्या गोष्टी हजर.

भारी आहे ना ही ऑनलाइनची दुनिया, कोणत्याच गोष्टीसाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही. सध्या सणासुदीच्या काळात मुहूर्त शोधण्यापासून पूजा पार पडेपर्यंत सर्व गोष्टींसाठी मोबाईल ऍपचा वापर वाढला आहे. नवीन पिढीसोबत शहरात नवीन राहायला आलेले नागरिक गुरुजींच्या बुकिंगसाठी मोबाईल ऍपचा वापर करत आहेत. सत्यनारायण, लग्न, मुंज, होम-हवन, वास्तुशांती, ग्रहशांती अशा वेगवेगळ्या धार्मिक कार्यांसाठी आवश्‍यक सेवा ऍप्लिकेशनद्वारे मिळाल्याने कमी वेळात काम होते. तसेच, शहरातील खात्रीशीर गुरुजींची नोंदणी या ऍपवर आहे.

अनेकदा धार्मिक विधींसाठी सगळ्यांच्या कामाच्या वेळा सांभाळून मुहूर्त ठरविले जातात. मग आयत्या वेळी पंडितही उपलब्ध असतीलच असे नाही. पूजेसाठी काय सामग्री लागते, ती कुठे मिळेल आदी गोष्टी लोकांना माहीत नसतात. या सर्व गोष्टींचा गुंता ऍप सोडविताना दिसते. वर्षभरातील मुहूर्त, पूजा सांगणाऱ्या गुरुजींचे अनेक पर्याय एका क्‍लिकवर उपलब्ध असून, कोणत्या विधीसाठी किती दक्षिणा द्यावी लागेल, याची माहितीही ऍपवरच मिळते. मग लागणारी सामग्री आपण आणणार की गुरुजी, हा पर्यायही तुमच्याकडे आहे. त्यानुसार दक्षिणा कमी-जास्त होते. मग काय ऍपच्या वापराने तुम्हालाही नक्कीच “मुहूर्त‘ सापडेल.

नागरिकांची गरज ओळखून आम्ही दोन वर्षांपूर्वी “मुहूर्तमाझा‘ हे ऍप तयार केले असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे 140 प्रकारच्या धार्मिक विधींसाठी आवश्‍यक सेवा पुरविली आहे. सध्यातरी आठ शहरांत अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमसाठी हे ऍप आहे.
– सुघोश सोवळे, संस्थापक, मुहूर्तमाझा ऍप

Source : esakal.com